चालता बोलता न्यूज

Search Everything

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

Main Admin / Jun 11, 2026, 02:27 PM IST

Article link copied

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान


पिंपरी (प्रतिनिधी)– राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब त्यांच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित करणारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे सी. एस. आर. कक्षाअंतर्गत शहरातील विविध उद्योगसमुहांसवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

                याप्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सह आयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध उद्योग समूहांचे सीएसआर प्रतिनिधी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, दत्तात्रय वारे गुरुजी यांनी विकसित केलेली शैक्षणिक पद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेली सकारात्मक क्रांती ही केवळ काही शाळांपुरती मर्यादित नसून ती राज्य आणि देशपातळीवर विस्तारत आहे. त्यांच्या कार्यामुळे शासकीय शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला असून सरकारी शाळाही जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ शकतात, हा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला आहे.

Advertisement Slot